May 12, 2022 जळगाव ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यंदा लागवड आठ टक्क्यांनी वधारून १० लाख हेक्टरवर होवू शकते. तसेच पूर्वहंगामी किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या कापूस पिकाखालील क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.
कापूस लागवडीत खानदेश राज्यात आघाडीवर आहे. जळगाव जिल्हा कापूस लागवडीत राज्यात क्रमांक एक असून, जिल्ह्यात यंदा एक लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एक लाख २० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. धुळ्यातही लागवड एक लाख २५ हजार हेक्टवर होऊ शकते. तर नंदुरबारातील लागवडही एक लाख १५ हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते. धुळ्यात गेल्या हंगामात दोन लाख हेक्टरवर तर नंदुरबारात ९३ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती.
यंदा कापसाचे दर सुरुवातीपासून टिकून होते. उत्पादन कमी आले, पण दर बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकऱ्यांचा तोटा कमी झाला. इतर पिकांमध्ये दरांची व पणनसंबंधीची अडचण असते. ही अडचण लक्षात घेता शेतकरी कापूस पिकाकडे वळतील. पूर्वहंगामी कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्टरवर तर धुळ्यात २५ आणि नंदुरबारात सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवर होऊ शकते. तापी, गिरणा, पांझरा, अनेर, गोमाई आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात लागवड अधिक असणार आहे.
लागवडीसाठी शेतकऱ्यांनी क्षेत्र राखीव केले आहे. त्यात पूर्वमशागत सुरू आहे. खोल नांगरणी व शेत भुसभुशीत करण्यासाठी रोटाव्हेटर करून घेतले जात आहे. यंदा बियाणे जूनमध्ये मिळणार आहे. यामुळे लागवडदेखील २ किंवा ४ जूनपासून सुरू होईल, अशी स्थिती आहे. अनेक शेतकरी बाजरी, गहू पिकांच्या बेडवर कापूस लागवड करण्याचे नियोजन करीत आहेत.
बियाणे टंचाई होणार नसल्याचे खबरदारी
जळगाव जिल्ह्यात खरिपाखालील एकूण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर एवढे असते, त्यात एकट्या कापसाची लागवड पाच लाख ३५ हजार हेक्टरवर जाणार असल्याने बियाण्यासंबंधीचे नियोजनही कृषी विभाग करीत आहे. सुमारे २५ लाख कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. तसेच कृत्रीम टंचाई होणार नाही, यासाठीदेखील कार्यवाही केली जात आहे.