यंदा देशातील आणि राज्यातील कापड उद्योगांना कापूस टंचाईचा सामना करावा लागला होता. ही टंचाई पुढील हंगामातही कायम राहण्याची शक्यता आहे. -
August 17, 2022 पुणे : यंदा देशातील आणि राज्यातील कापड उद्योगांना कापूस टंचाईचा सामना करावा लागला होता. ही टंचाई पुढील हंगामातही कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या खरीप हंगामात देशभरात कापसाची लागवड ११३.५१ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा त्यात भर पडून जुलैअखेपर्यंत देशभरात १२१.१३ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. तरीही नैसर्गिक आपत्तींमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे, त्यामुळे पेरा वाढूनही उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. या सगळय़ाचा परिणाम लवकरच कपडे महागण्यात होण्याची चिन्हे आहेत.
देशात सुमारे ४०० लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादनाचा अंदाज आहे. पण, अतिवृष्टी आणि अवेळी झालेला पाऊस आणि गुलाबी बोंड अळीचे संभाव्य संकटाचा परिणाम म्हणून अपेक्षित उत्पन्न येण्याची शक्यता कमीच आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी कापूस अजूनही पाण्यात आहे. पीक पिवळे पडू लागले आहे. ही स्थिती कापूस पिकाला अनुकूल नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादन हाती येण्याची शक्यता नाही, तुलनेत उत्पादन खर्चात मात्र वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे अपेक्षित उत्पादन येणार नसल्याने कापड उद्योगाला यंदाही कापूस टंचाईचा सामना करावा लागेल, अशीच स्थिती आहे.