पांढरं सोनं अजूनही घरातच, खरिपाच्या पूर्वतयारीचं आव्हान; अर्थसंकट कायम,शेतकऱ्यांची कापूस कोंड

Cotton Rate : विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या आशेनं कापूस विक्री केला नव्हता. आता खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. -


May 30, 2023 यवतमाळ : मागील वर्षी कापसाचे दर १४ हजार रुपये प्रती क्विंटलवर गेले. हीच दरवाढ कायम राहणार या आशेवर शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला. अजूनही दरवाढ न झाल्याने ३० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. सध्या कापसाचे दर ६ हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पण, जुनी देणी फेडल्याशिवाय नव्या हंगामासाठीचे कृषी साहित्य मिळणे कठीण आहे. अशा दुहेरी कोंडीत अडकलेला शेतकरी आता मिळेल त्या भावात कापसाची विक्री करीत असल्याचे चित्र आहे.

खुल्या बाजारात वाढलेल्या कापसाच्या दराचा लाभ मागील वर्षी व्यापाऱ्यांना अधिक झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कापूस विकल्याने हा लाभ मिळू शकला नव्हता. हा अनुभव पाठिशी असल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वाढविला. यवतमाळ जिल्ह्यात साधारणत: ४ लाख ४१ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. सुरुवातीच्या काळात अतिवृष्टी होऊन नुकसान झाले. अधिक भाव मिळणार ही आशा असल्याने दुबार आणि तिबार पेरणी केली. कापूस वेचणीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने अडचण वाढली. सुरुवातीच्या काळात खुल्या बाजारात ६ हजार ८००रुपयांचा भाव मिळाला. दिवाळीनंतर दर वाढू लागले. जानेवारी महिन्यात खुल्या बाजारात कापसाला ८ हजार ६०० रुपयांचा दर मिळाला. काही भागात नऊ हजार रुपयांपर्यंत हे दर होते. भाववाढ ही कायम राहणार म्हणून शेतकऱ्यांना गरजेपुरता कापूस विकला. मे महिना संपायला आला असता दर अधिकच घसरले आहे. जवळपास २,२०० रुपयांनी हे दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नेमके काय घडले?
जानेवारी महिन्यात अमेरिका, ब्राझील, चीनमध्ये कापड उद्योगात मंदी आली. कापसाच्या केवळ दहा लाख गाठींची निर्यात होऊ शकली. मागील वर्षी हा आकडा ४८ लाख गाठी इतका होता. मंदीची झळ अजूनही कायम असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. परिणामी दर वाढण्याऐवजी कमी होऊ लागले आहेत. सध्या साडेसहा ते सात हजार रुपयांपर्यंतचा दर खुल्या बाजारात मिळत आहे.

अडचणीच अडचणी...

- मृग नक्षत्र दहा दिवसांवर

- नव्या हंगामातील पेरणीपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त.

- मशागत, बियाणे आणि खताचा खर्च करण्यासाठी पैशांची गरज.

- कापूस विक्री झाली नसल्याने मागील वर्षीची देणी थकली.

- खत, बियाणे आणि इतर साहित्यांच्या खरेदीचा प्रश्न.

- भाववाढीची आशा सोडून मिळेल त्या भावात कापसाची विक्री.

- बाजारात आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी अधिकच भाव पाडले.

- सरकाकडून शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष.

आगीच्या घटनांची भीती अन्‌ आजार

अनेक शेतकऱ्यांनी टिनपत्र्याच्या खोलीत कापूस ठेवलेला आहे. वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यात कापूस पेट घेण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. मागील आठवड्यात पुसद तालुक्याच्या पार्डीतील अमोल झरकर या शेतकऱ्याच्या घरातील साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागून वडिलोपार्जित वाडा खाक झाला होता. तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कापसावर किड्यांचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेकांच्या अंगावर लाल पूरळ येत असल्याने नवी समस्या निर्माण झाली होती. भाववाढ होऊन दिलासा मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी हा त्रासही सहन केला होता.

‘ऊस, कांदा उत्पादकांप्रमाणे व्हावा विचार’

ऊस आणि कांदा उत्पादकांना नुकसानीपासून वाचविण्यासाठी सरकारने मदतीची घोषणा केली. हीच परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही असल्याने त्यांचाही मदतीसाठी विचार करण्यात यावा, अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांनी केली आहे.
एकाधिकार योजना निकामी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पूर्वी दलालांमार्फत फसवणूक होत होती. ही अडचण सोडविण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात कापूस एकाधिकार योजना आणण्यात आली. खुल्या अर्थव्यवस्थेत ही योजना निकामी ठरली आहे.


सध्या कापसाचे भाव कोसळलेले असल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. आज आमचे हात बांधले आहेत. आम्हाला काहीही अधिकार ठेवले नाही. आम्ही कापूस खरेदी सुरू केली असती तर पर्यायी व्यवस्था राहिली असती.
राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष राज्य कापूस उत्पादक पणन महामंडळ


Share to ....: 373                

Currency

World Cotton Balance Sheet

India Cotton Balance Sheet

Visiter's Status

knowledge management

Weather Forecast India

how to add shortcut on chrome homepage - www.cottonyarnmarket.net


Upload your business visiting Card:
No Image