नागपूरमध्ये म्हाडा उभारणार ‘टेक्स्टाईल हब’

आठ मजली कापड संकुलात तीन हजार कापड व्यावसायिकांना एका छताखाली आणणार -


September 03, 2023 मुंबई : नागपूरमधील मध्यवर्ती गणेश पेठ परिसरातील सुमारे चार एकर भूखंडावर लवकरच एक टेक्स्टाईल हब उभारण्यात येणार आहे. म्हाडाच्या नागपूर मंडळाच्या माध्यमातून येथे आठ मजली कापड संकुल बांधण्यात येणार आहेत. या संकुलाच्या माध्यमातून नागपूरातील ३००० कापड व्यवसायाशी संबंधित दुकानदार, उद्योजकांना एका छताखाली आणले जाणार आहे. कापड निर्मितीपासून ते तयार कपडयांची विक्री असे सर्व व्यवहार येथे होणार आहेत.

नागपूरमधील बडी मार्केट, केळीबाग रोड, इतवारी, गांधीबाग येथील कापड मार्केट रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी तोडण्यात आले आहे. यामुळे विस्थापित झालेल्या कापड उद्योगाशी संबंधित सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना एकाच ठिकाणी गाळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातूनच टेक्सटाईल हबची संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार गणेश पेठ येथील म्हाडाच्या मालकीच्या जागेवर कापड संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाचे नागपूर मंडळच हे संकुल उभारणार आहे. गणेशपेठ येथे नागपूर मंडळाचा एक हजार घरांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या जागेपैकी २० टक्के जागेवर हे कापड संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी दिली.

कापड संकुल प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर असून नुकतीच या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी आणि मेघमाळे उपस्थित होते. प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी यावेळी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. या सादरीकरणानुसार आठ मजली संकुल बांधण्यात येणार असून त्यात तीन हजार व्यापारी, दुकानदारांना सामावून घेण्यात येणार आहे. या संकुलात येणाऱ्या ग्राहकांसाठी तीन मजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्यावरील सहा मजली संकुलात प्रत्येक मजल्यावर लहान मुले, पुरुषांचे कापड मार्केट, साडी मार्केट आणि फक्त कापड व्यापाराशी संबंधित दुकाने असणार आहेत. या संकुलातील सर्वात वरील मजल्यावर ग्राहकांच्या सोयीकरता खानपानाची सोय असणार आहे. तर संकुलाच्या गच्चीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून या माध्यमातून संकुलाला लागणाऱ्या विजेची गरज पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. या संकुलाचा आराखडा तयार करण्याकरिता हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर प्रकल्पाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे.

या संकुलातील गाळ्यांची विक्री म्हाडाच्या प्रचलित ई लिलावाद्वारे केली जाणार आहे. मंडळाकडून एक बोली लावली जाईल आणि त्यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्याला या संकुलातील गाळा वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान म्हाडाकडून ई लिलावाद्वारे या संकुलातील गाळेविक्री होणार असली तरी या गाळ्यांच्या किमती कमी, परवडणाऱ्या असतील असे संकेत नितीन गडकरी यांनी दिले आहेत.


Share to ....: 160                

Currency

World Cotton Balance Sheet

India Cotton Balance Sheet

Visiter's Status

knowledge management

Weather Forecast India

how to add shortcut on chrome homepage - www.cottonyarnmarket.net


Upload your business visiting Card:
No Image