Cotton Rate : कापसाचे मुहूर्त दर ठरले फसवे

खरेदीदारांची फक्त प्रसिद्धीसाठी जुजबी खेडा खरेदी -


October 03, 2022 जळगाव ः खानदेशात यंदा अगदी गणेशोत्सवातच कापूस खरेदीचा (Cotton) मुहूर्त अनेक खरेदीदार, कारखानदारांनी केला. या काळात १११११, १०१२१ रुपये प्रतिक्विंटल असे दर कापसाला खेदीदारांनी दिले. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काटापूजन, खरेदीची छायाचित्रे व दिलेले दर याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली. प्रसार माध्यमांत वृत्त प्रसिद्ध करून मोठी प्रसिद्धीही अनेक खरेदीदार, कारखानदारांनी केली. परंतु हे दर फसवे ठरले आहेत. कारण सध्या कापसाची सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा खरेदी सुरू आहे.

गणेशोत्सवात कापूस खरेदी व आपापल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्याची प्रसिद्धी करून घेण्याचा मुहूर्तही खरेदीदारांनी यंदा साधला. गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या घरात कापूस नसतो. या काळात कोरडवाहू कापसाला फुले, पाते जेमतेम असतात. तर पूर्वहंगामी (बागायती) कापसात कैऱ्या उमलण्याची स्थिती असते. अर्थातच बाजारात आवक नसते. पण या काळात खरेदीदार, व्यापारी, एजंट मंडळीने कारखान्यात काटापूजन, खेडा खरेदी, दिलेले विक्रमी दर अशी माहिती, छायाचित्रे त्या वेळी सोशल मीडियामध्ये व्हायरल केली. शेतकऱ्यांना चांगले दर खरेदीदार देत असल्याचे लक्षात घेऊन याला प्रसिद्धीही चांगली मिळाली. अगदी मुख्य पानावर वृत्तही प्रसिद्ध झाले. पण खरेदीदारांनी १० किलो, १५ किलो एवढ्याच कापसाची खरेदी त्या वेळी ११ ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर दिले. कुण्याही खरेदीदाराने दोन, पाच, १०, २०, ५० क्विंटल किंवा यापेक्षा अधिक कापसाची खरेदी ११ ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात केली नाही. पण हे फसवे दर व त्यासंबंधीच्या वृत्तांचा सपाटा यामुळे कापूस वेचणी, कापसातील फवारणी व इतर मजुरीचे दर यंदा १५ ते २० टक्क्यांनी वाढले. काही भागात सहा तासांच्या कापूस वेचणीसाठी २०० ते २५० रुपये रोज अशी मजुरी आहे. काही

काही भागात सात रुपये प्रतिकिलो, अशी मजुरी द्यावी लागत आहे. फवारणीसाठी ३०० ते ४०० रुपये रोज, अशी मजुरी मोजावी लागत आहे. मजुरांनी कापसाला १२ हजार रुपये दर असल्याचा मुद्दा रेटून धरला व मजुरीचे दरही वाढवून घेतले. त्यातच गणेशोत्सवानंतर पाऊस बरसतच राहिला. पावसात कापसाचे मातेरे झाले. दुसरीकडे मजुरीचे दर वाढले, पण उत्पादन हातचे गेले. तिहेरी फटका म्हणजे कापसाला आता सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर खानदेशात खेडा खरेदीत दिला जात आहे. त्यातही कवडी किंवा अधिक आर्द्रतेच्या कापसाला वेगळा व वाळविलेल्या कोरड्या (कमी आर्द्रता) कापसाला वेगळा, असे दोन-तीन दर दिले जात आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कापसाच्या मोठ्या किंवा १२ हजार रुपये दराची हवा पसरली नसती तर मजुरीचे दर स्थिर राहिले असते आणि शेतकऱ्यांचेही वित्तीय नियोजन यशस्वी झाले असते. परंतु कापसाचे मुहूर्ताचे दर शेतकऱ्यांसाठी वित्तीय हानी, हिरमोड करणारे ठरले आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
कापसाचे मुहूर्ताचे दर फसवे होते. खरेदीदारांनी त्या वेळी १२ ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरात १० ते पाच किलो एवढ्याच कापसाची खरेदी केली. गणेशोत्सवात चांगला प्रसिद्धीचा मुहूर्त त्यांनी साधला. आता तेच खरेदीदार कापसाला कवडी, अधिक ओलावा अशी कारणे सांगून सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर सांगत आहेत. खेडा खरेदी ठप्प आहे. अनेक जिनिंग प्रेसिंग कारखाने अद्याप बंद आहेत. मुहूर्ताच्या दरांची हवाबाजी मोठी डोकेदुखीच ठरत आहे. कारण अधिक दरांचा मुद्दा मजूर व इतरांनी उचलला आणि मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत.
- कडूअप्पा पाटील, शेतकरी नेते


Share to ....: 252    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 31714373

Saying...........
Misfortune: the kind of fortune that never misses.





Cotton Group