December 03, 2022 खानदेशात नोव्हेंबरअखेर मागील हंगामाच्या तुलनेत कापसाची आवक तब्बल दीड लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) कमी झाली आहे. सुमारे ६० हजार गाठींएवढ्या कापसाची आवक बाजारात झाली आहे. जळगाव ः खानदेशात नोव्हेंबरअखेर मागील हंगामाच्या तुलनेत कापसाची आवक (Cotton Arrival) तब्बल दीड लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) कमी झाली आहे. सुमारे ६० हजार गाठींएवढ्या कापसाची आवक बाजारात झाली आहे. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चामुळे (Cotton Production Cost) पीक परवडत नसल्याची स्थिती आहे.
किमान ११ ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना हवा आहे. यामुळे पूर्वहंगामी कापूस उत्पादकांनी सध्याच्या दरांत किंवा ते साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात कापूसविक्री टाळली आहे. खानदेशात यंदा २५ लाख गाठींची निर्मिती विविध कारखान्यांत होईल, असे सांगितले जात आहे.
कापूस दरात सध्या चढउतार सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दर नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात नंतर काहीशी घसरण झाली. दर साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल झाले. सध्या दर स्थिर आहेत.
कापसाची खेडा खरेदी खानदेशात रखडत सुरू आहे. खरेदीदार गावोगावी जात आहेत. परंतु शेतकरी विक्री टाळत आहेत. यामुळे बाजारात कापसाची आवक कमी दिसत आहे. यातच दरांमधील चढउतार लक्षात घेता शेतकऱ्यांनी कापसाचे फरदवड (खोडवा) पीक घेणे टाळले आहे. खानदेशात पूर्वहंगामी कापसाखालील मोठे क्षेत्र नोव्हेंबरमध्ये रिकामे झाले असून, त्यात मका, गव्हाची पेरणी झाली आहे.
गुजरातमधून मागणी येणार
खानदेशसह मराठवाडा, विदर्भातील काही भागांतून गुजरातमधील मोठे खरेदीदार, कारखानदार कापूस आयात करतात. सध्या गुजरातमध्ये निवडणूक सुरू आहे. धुळे व नंदुरबारात या निवडणुकीमुळे कापूस व इतर व्यापार ठप्प दिसत आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर कापूस दरात सुधारणा होईल, असा विश्वास एजंट व काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.