जिरायती कापसाचे पीक यंदाही तोट्यातच

Cotton Production : नगरसह शेजारच्या मराठवाडा, विदर्भात कापसाचे उत्पादन घेतले जाते. पुणे, नाशिक, सांगली, सोलापुरातील काही भागांत अलीकडच्या काळात कापसाची लागवड केली जात आहे. -


March 20, 2024 Nagar News : कापूस पिकाने यंदाही शेतकऱ्यांना तोट्यात नेले आहे. नगर जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून निश्चित करण्यात आलेल्या उत्पादकतेनुसार जिरायती कापसाचे एकरी १६५ किलो (हेक्टरी ४१४ किलो) उत्पादकता निघाली आहे. बागायती कापसाचे क्षेत्र अल्प असते. बागायती कापसाचेही एकरी १९६ किलो ९६४ ग्रॅम (हेक्टरी ४९२ किलो ४१० ग्रॅम) उत्पादकता निघाली आहे.

नगरसह शेजारच्या मराठवाडा, विदर्भात कापसाचे उत्पादन घेतले जाते. पुणे, नाशिक, सांगली, सोलापुरातील काही भागांत अलीकडच्या काळात कापसाची लागवड केली जात आहे. उसाचा आणि साखर कारखान्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात आता सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्टरवर कापसाची लागवड (Kapus Lagwad) होत आहे.

यंदा पावसाळ्यात (Rain) सुरुवातीला व त्यानंतरही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे कापसाच्या वाढीला, बोंडे लागण्यावर आणि त्याचा उत्पादनावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. हाती आलेल्या उत्पादनाचा विचार करता यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या पिकाने तोट्यातच नेल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, नेवासा राहुरी भागांत कापसाचे क्षेत्र अधिक असते. शेवगावात जिरायती भागात एकरी २२२ किलो, नेवाशात १८९ किलो, पाथर्डीत १४१ किलो उत्पादकता निघाली. राहुरीत, संगमनेर, श्रीरामपुरात यापेक्षाही कमी उत्पादन निघाले आहे.

जिरायती भागात यापेक्षा थोडेसे अधिक उत्पादन असले तरी फारसा फरक नाही. कापूस पिकांसाठी लागणारा खर्च आणि मिळालेले उत्पादन पाहता कापसाने यंदाही आतबट्ट्यात नेले असताना शासन, लोकप्रतिनिधीकडून मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

खरेदीबाबत गांभीर्य नाही

अपुरा पाऊस, मध्यंतरी पावसाने दिलेला खंड यामुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी निघाले, त्यातच कापसाला दरही फारसा नाही. त्यामुळे दर मिळेल या आशेने नगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात अजूनही शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे.

शासनाने कापसाची खरेदी (Cotton Purchase) करणे गरजेचे असते. मात्र सरकारी खरेदी केंद्रे सुरू केले नाही. काही भागात खरेदी केंद्रे सुरू झाली, त्याबाबत लोकांपर्यंत माहिती पोचवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करण्याबाबत फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्याचाही फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

प्रति क्विंटलला तीन हजारांचा फटका

यंदा सुरुवातीला कापसाला प्रति क्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर होता. कापसाचे उत्पादन कमी असल्याने दरात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दरात वाढ होण्याऐवजी दरात घट होत गेली.

उन्हाचा वाढता चटका आणि दरात होणारी घसरण पाहून सुरुवातीला मिळणाऱ्या दरापेक्षा प्रति क्विटंल तीन हजारांचा फटका सोसत शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. त्यामुळे आधीच उत्पादनात घट, त्यात दरातही तीन हजारांचा फटका असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे.


Share to ....: 1116    


Most viewed


Short Message Board

Weather Forecast India

Visiter's Status

Visiter No. 35536442

Saying...........
The graveyards are full of indispensable men.





Cotton Group